ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथून २७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल प्रकाश तांबे (वय २७, रा. घर क्र. १०८८, करबुडे, मळगाव, ता. जि. रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील प्रकाश गोपाळ तांबे (वय ६०) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रफुल्ल याने गणपतीची पूजा केली. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास ‘मी निवळी येथे जाऊन येतो,’ असे वडिलांना सांगून तो घरातून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही.
प्रफुल्ल घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूचा परिसर, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तसेच सासरवाडी येथे शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेले असावे, असा संशय व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली.
या घटनेची नोंद १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये करण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









