Tuesday, September 15, 2026
spot_img
Home चिपळूण असुर्डे बोगद्यात रेल्वेच्या धडकेत प्राैढाचा मृत्यू

असुर्डे बोगद्यात रेल्वेच्या धडकेत प्राैढाचा मृत्यू

चिपळूण:- बाेगद्यात रेल्वे रुळावर बसलेले असताना अचानक गाडी आल्याने धावत सुटलेल्या एका ४१ वर्षीय प्राैढाला रेल्वेची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्राैढाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कोकण रेल्वेच्या असुर्डे बोगद्यात रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.

गौरंग कैलास प्रधान (रा. दुधापन्नी, कुरीये, सुंदरगड, ओडिशा) असे प्रौढाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेले संदीप काशिनाथ खेतले हे १३ सप्टेंबर रोजी पहाटे असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळाची पाहणी व पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी बोगद्यामध्ये गौरंग प्रधान हे रुळाच्या बाजूला बसलेले त्यांनी पाहिले हाेते. दरम्यान, सकाळी सुमारे ६:१५ ते ६:३० वाजण्याच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी हॉलिडे स्पेशल रेल्वे बोगद्यात आली. रेल्वे जवळ येताच प्रधान हे अचानक उठून रेल्वेच्या पुढे धावू लागले. या ठिकाणाहून रेल्वे पुढे गेल्यानंतर खेतले यांनी परिसराची पाहणी केली असता प्रधान हे रुळाच्या बाजूला गंभीर जखमी अवस्थेत पडलेले त्यांनी पाहिले. खेतले यांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघाताप्रकरणी सावर्डे पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.