८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी:- शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मागे आणि निवखोल येथील लाला कॉम्प्लेक्स जवळ छापा टाकून पोलिसांनी तब्बल ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाखाली एलसीबीचे पथक गस्तीवर असताना एक संशयित मिळून आला. अलमहीब असगर सोलकर (वय ३०, रा. कर्ला, ता. जि. रत्नागिरी) असे यातील आरोपीचे नाव आहे. त्याच्या झडतीदरम्यान २६ हजार रुपये किमतीचे ४.५ ग्रॅम वजनाचे (निव्वळ २.५ ग्रॅम) प्रत्येकी ५०० रुपये किमतीच्या ५२ पुड्यांमध्ये भरलेले ब्राऊन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच पुड्या बांधण्यासाठी वापरलेले कागद, रिकाम्या पिशव्या आणि २० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याबाबत पोहवा गणेश राजेंद्र सावंत (नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) यांनी फिर्याद दिली असून १३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास निवखोल, रत्नागिरी येथे जाणाऱ्या लाला कॉम्प्लेक्स समोरील इलेक्ट्रिक पोलजवळ करण्यात आली. तनवीर युसूफ मुल्ला (वय ५२, रा. राजीवडा, बडये मशीद जवळ, ता. जि. रत्नागिरी) असे या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यामध्ये १६ हजार रुपये किमतीचे ३.५ ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाच्या उग्रवासाचे ब्राऊन हेरॉईन (टरकी) अमली पदार्थाच्या पुड्या मिळून आल्या. तसेच १९ हजार रुपयांचा ओप्पो ए-७८ मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोहवा विनोद विश्राम कदम यांनी फिर्याद दिली असून, १३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ४७ मिनिटांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









