रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील निवखोल येथे ब्राऊन हेरॉईन विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणावर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ आणि दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई १० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास निवखोल ते कर्ला जाणाऱ्या रस्त्यावरील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १७ च्या बांधकामाच्या ठिकाणी करण्यात आली.
मुस्तकीम युसूफ मुल्ला (३५, रा. घर क्र. २२५, राजीवडा, रत्नागिरी) हा दुचाकीवर बसलेला असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर अमली पदार्थासह दुचाकी ताब्यात घेतली.कारवाईत ३५ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याचे एकूण वजन ५.५ ग्रॅम असून, निव्वळ ब्राऊन हेरॉईनचे वजन २.५ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यासोबत एक पारदर्शक प्लास्टिकची पांढरी पिशवीही जप्त करण्यात आली.अमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरल्याचा संशय असलेली ५५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मेस्ट्रो मॉडेलची पांढऱ्या रंगाची दुचाकी (एमएच-०८- एएम-३२१२) पोलिसांनी ताब्यात घेतली. अमली पदार्थ आणि दुचाकी मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९० हजार रुपये आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.









