Monday, September 7, 2026
spot_img
Home गुहागर गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी आढळला धड नसलेला मृतदेह

गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी आढळला धड नसलेला मृतदेह

गुहागर:- तालुक्यातील बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सुमारे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा धड नसलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्यापूर्वी बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती पुरुष असून त्याचे अंदाजे वय ४५ वर्षे असल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून धडाचा काही भाग नसल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून मृतदेहाबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव, गाव व इतर ओळख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच तो समुद्रकिनारी कसा आला, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत.

या प्रकरणाची नोंद आमृ. क्रमांक ३८/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये ३ सप्टेंबर रोजी रात्री ९.११ वाजता करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, शवविच्छेदन व अन्य तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.