Tuesday, June 16, 2026
spot_img
Home गुहागर वडद येथे खिडकी फोडून घरात शिरला बिबट्या

वडद येथे खिडकी फोडून घरात शिरला बिबट्या

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वडद गावात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. घराची खिडकी फोडून बिबट्या घरात शिरल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वडद गावातील गणपतवाडी येथे पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या बंद घरात बिबट्याने प्रवेश केला. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुदैवाने, त्या वेळी घरात कोणीही नव्हते. पूजा शिंदे या रात्री शेजारील घरी झोपायला गेल्या होत्या. रात्री अचानक जोराचा आवाज आल्याने त्या बाहेर आल्या आणि त्यांनी त्याच खिडकीच्या काचेतून बिबट्याला उडी मारून बाहेर पडताना पाहिलं. “मी त्या वेळी घरात नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला,” असं सांगत त्यांनी देवाचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून वडद परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.