Sunday, August 30, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूण खांदाट येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी

चिपळूण खांदाट येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी

चिपळूण:- चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथे शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर काही जखमींवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास चिपळूणहून चोरवणेकडे जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी येथील वळणावर एकमेकांवर आदळल्या. दोन्ही बसची धडक अत्यंत भीषण असल्याने बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली. काही प्रवाशांच्या डोक्याला, जबड्याला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली असून काहींचे दातही पडल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

खांदाट गवळवाडी परिसरातील हा मार्ग तीव्र उतार आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून तपासानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

अपघाताची माहिती मिळताच खांदाटपाली, आंबडस आणि चिरणी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य केले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिका तसेच उपलब्ध वाहनांच्या मदतीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, त्यांच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त बस हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

कामथे उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. एसटीचे अधिकारी रुग्णालयात उपस्थित राहून जखमी प्रवाशांच्या उपचाराची माहिती घेत होते.