Friday, August 28, 2026
spot_img
Home दापोली गुजरातच्या बोटीची स्थानिक बोटीला धडक

गुजरातच्या बोटीची स्थानिक बोटीला धडक

हर्णेच्या समुद्रात मासेमारीदरम्यान थरार;मोठे नुकसान

दापोली:- हर्णे समुद्रात खोल समुद्रात मासेमारी सुरू असताना गुजरातमधील मासेमारी बोटीने स्थानिक मासेमाराच्या बोटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात महेश वाघे यांच्या मालकीच्या मासेमारी बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मासेमारीदरम्यान झालेल्या या धडकेची माहिती हर्णे बंदरातील स्थानिक मासेमारांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नुकसानग्रस्त बोट समुद्रातून सुरक्षितपणे हर्णे किनाऱ्यावर आणण्यासाठी स्थानिक मासेमारांनी मदत केली. धडक देणाऱ्या गुजरातमधील मासेमारी बोटीलाही पुढील कार्यवाहीसाठी हर्णे बंदरात आणण्यात आले.

घटनेनंतर काही काळ समुद्रात आणि बंदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक बोटीचे मोठे नुकसान झाल्याने मासेमारांमध्ये नाराजी होती. मात्र, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी गुजरातमधील बोटमालकांनी झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारत आपली चूक मान्य केली.

तसेच नुकसान झालेल्या बोटीची भरपाई देण्याची तयारी गुजरातमधील बोटमालकांनी दर्शविल्याने निर्माण झालेला वाद प्राथमिक पातळीवर मिटल्याचे समजते. दरम्यान, समुद्रातील या घटनेत कोणत्याही मासेमाराला दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या स्थानिक बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.