Friday, August 21, 2026
spot_img
Home दापोली वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ई-शिवाई कर्मचाऱ्याने केले फिनाईल प्राशन

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ई-शिवाई कर्मचाऱ्याने केले फिनाईल प्राशन

दापोली एसटी आगारातील घटना

दापोली:- दापोली आगारातील ई-शिवाई बसच्या एका कर्मचाऱ्याने मानसिक त्रासाला आणि अन्यायाला कंटाळून फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दापोली आगार परिसर आणि परिवहन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कामावरील ड्युटी वाटपातील गैरप्रकार, राजकीय हस्तक्षेप आणि संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाकडून होणाऱ्या छळामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप या कर्मचाऱ्याने केला आहे.

संबंधित कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, आगारात ड्युटी वाटपात सातत्याने डावलले जात असून कामावर हजर असतानाही ड्युटी न देण्याचा प्रकार घडत होता. प्रशासकीय कामकाजात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि व्यवस्थापनाकडून होणारी पिळवणूक यामुळे गंभीर मानसिक तणाव निर्माण झाल्याचे पीडित कर्मचाऱ्याने म्हटले आहे. या संपूर्ण परिस्थितीला काही विशिष्ट अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे नमूद करत त्यांची नावेही समोर आणली आहेत. घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.