खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोर भरधाव थार गाडीने धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात एक अंदाजे ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजून ३४ मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपी आरीफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. परळेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा आपली महिंद्रा थार रॉक्स (क्रमांक MH09/GU/7275) ही गाडी घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून खेडकडून चिपळूणच्या दिशेने चालला होता. यादरम्यान लोटे एमआयडीसी येथील कॉर्टेवा कंपनीसमोर आल्यावर आरोपीने आपली थार गाडी अत्यंत भरधाव वेगात व हयगयीने चालवली.
यावेळी महामार्गावरील मध्य दुभाजकाजवळ खेडच्या दिशेने पाय चालत चाललेल्या एका अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला या थार गाडीने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सदर महिला किरकोळ व गंभीर दुखापतीमुळे घायाळ झाली, तसेच या अपघातात थार गाडीचेही किरकोळ नुकसान झाले.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित संतोष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी चालक आरीफ इसाक साठविलकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा (मो.वा.का.) कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील जखमी महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









