दोन्ही वाहनांचे नुकसान
रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी बौद्धवाडी रस्त्यावर एसटी स्टॉपच्या पुढे निष्काळजीपणे रुग्णवाहिका चालवून टेम्पोला ठोकर दिली. या अपघात प्रकरणी संशयित चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज ताहीर अली आलम (रा. रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर, इस्ट- मुंबई) असे संशयित रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सायंकाळी चारच्या सुमारास कशेळी ते गावखडी जाणाऱ्या रस्त्यावर गावखडी-बौद्धवाडी येथील एसटी स्टॉपच्या पुढे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रुग्णवाहिका चालक फिरोज आलम हे रुग्णवाहिका (क्र. एमएच -०५ इएल १८२१) घेवून कशेळी ते गावखडी जात होते. गावखडी-बौद्धवाडी रस्त्यावर रुग्णवाहिका निष्काळजीपणे चालवून समोरुन येणाऱ्या टेम्पो (क्र. एमएच-०९ जीजे ३५४२) ला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









