Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे चायनीज सेंटर बाहेर तुफान राडा; एअरगन काढल्याने एकच...

रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे चायनीज सेंटर बाहेर तुफान राडा; एअरगन काढल्याने एकच खळबळ

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका चायनीज सेंटरबाहेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाल्याने एकच खळबळ उडाली. बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून तिच्या भावाने चायनीज सेंटरवर जाऊन गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. यावेळी त्याने ‘माझ्या बहिणीला फूस लावलीस, तुला बघतोच’ असे म्हणत पिस्तूलसदृश हत्यार बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्यमनगर-ओसवालनगर परिसरातील एका तरुणाच्या बहिणीने लग्न केले होते. या लग्नाला तिच्या भावाचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी संबंधित तरुणी घरी आली आणि कपड्यांची बॅग घेऊन घरातून निघून गेली. याचा राग मनात धरून तिच्या भावाने रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर परिसरातील एका चायनीज सेंटरवर जाऊन गोंधळ घातला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये काही काळ धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येते. वातावरण चिघळले असतानाच संतप्त झालेल्या तरुणाने रिव्हॉल्व्हरसदृश हत्यार बाहेर काढल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही जणांनी तेथून काढता पाय घेतला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पिस्तूलसदृश हत्यार आढळून आले. सुरुवातीला ते रिव्हॉल्व्हर असल्याचे समजल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. मात्र, तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर ते रिव्हॉल्व्हर नसून माकडे पाळविण्यासाठी वापरली जाणारी एअर रिव्हॉल्व्हर असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्ती आणि अन्य नागरिक शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी परस्परविरोधी एनसी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.