अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरातील राजीवडा नाका येथील एका घराच्या ओपन टेरेसवरून मासळी पकडण्याची महागडी जाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजल्यापासून १५ मे रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडला. याबाबतची फिर्यादी इम्रान कमरुद्दीन मुल्ला (रा. घर नं. २१९, राजीवडा निवखोल, ता. जि. रत्नागिरी) यांनी ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) तसेच भा.द.वि.क. ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्या मालकीची मच्छी पकडण्याची जाळी त्यांचे सासरे मकबल मोहम्मद मोतीवाले (रा. घर नं. १३४५, राजीवडा नाका, ता. जि. रत्नागिरी) यांच्या घराच्या ओपन टेरेसवर ठेवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात कोणातरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादींच्या संमतीशिवाय चोरीच्या इराद्याने ही जाळी लांबवली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात १ लाख ३५ हजार रुपये किमतीची सुमारे ३०० किलो वजनाची, लाल रंगाची पर्सनेट नायलॉन धाग्याची मच्छी पकडण्याची जाळी तसेच ५० हजार रुपये किमतीची, सुमारे ५०० किलो वजनाची, हिरव्या रंगाची नायलॉन धाग्याची मच्छी पकडण्याची जाळी असा एकूण १,८५,००० रुपये समावेश आहे. घटनेची माहिती मिळण्यास आणि तक्रार देण्यास उशीर झाल्यामुळे आज रोजी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलीस या अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.









