Wednesday, July 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून ५७ हजार रुपयांची फसवणूक

रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून ५७ हजार रुपयांची फसवणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील विश्वनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरत येथील एका संशयितावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्मृतिका संजय पाटोळे (वय ५८, रा. उद्यम नगर रोड, रत्नागिरी) या २० जुलै रोजी सकाळी ११:३० वा. विश्वनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. डि-२१४, सदगुरू अपार्टमेंट, ए.एच. रोड, सुरत सिटी, जि. सुरत) याने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले.

आरोपीने फिर्यादींना दुसरेच एटीएम कार्ड देऊन त्यांची दिशाभूल केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून एटीएमचा वापर करून ५०,००० रुपये रोख काढून घेतले. तसेच, प्रियांका वाईन मार्ट येथे कार्डद्वारे ७,७०० रुपये परस्पर खर्च करून फिर्यादींची एकूण ५७,७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

​या प्रकरणी फिर्यादी स्मृतिका पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(२) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.