१ लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानक परिसरामध्ये गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) अन्वये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून २१३ ग्रॅम गांजासह दोघा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी संकीर्ण राजेश कदम (वय २८, रा. रेहाळभागाडी, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी) आणि ऋषिकेश अशोक पवार (वय २९, रा. पागमळा, स्वानंद अपार्टमेंट, बी विंग, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.
चिपळुण रेल्वे स्टेशन शेजारी एक व्यक्ती विक्री करण्यासाठी गांजा सदृश्य पदार्थ जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी १६.३४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात कारवाई केली. या कारवाईदरम्यान संकीर्ण राजेश कदम हा हातातील निळ्या रंगाच्या बॅगमधील पारदर्शक प्लॉस्टिक पिशवीत गांजा बाळगून विक्री करण्याच्या स्थितीत मिळून आला.
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत, आरोपी ऋषिकेश अशोक पवार याने हा माल संकीर्ण कदम याला विक्रीसाठी दिल्या उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुसऱ्या आरोपीलाही रात्री १९.३५ वाजण्याच्या सुमारास अटक केली.
या कारवाईत १४,००० रुपये किमतीचा २१३ ग्रॅम वजनाचा गांजा, ८६,००० रुपये किमतीची बजाज कंपनीची २२० पल्सर हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चिपळुण पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ८ (क), २० (ब) ii (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









