डोंबिवलीतील डॉक्टर हल्यानंतर संतापाची लाट
रत्नागिरी:- डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातही प्रतिसाद मिळणार आहे. सोमवारी (दि. २०) सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी (दि. २१) सकाळी ६ वाजेपर्यंत रत्नागिरीतील सुमारे १२० डॉक्टर एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होणार असून नियमित ओपीडी सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, अत्यावश्यक व आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहतील.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने ही माहिती दिली असून, डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराविरोधात राज्यभर हा निषेध नोंदविण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर करण्यात येणार आहे.
डॉक्टरांवरील हल्ले म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवरच हल्ला असल्याचे मत आयएमएने व्यक्त केले आहे. डोंबिवलीतील घटनेत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्याशी असभ्य आणि आक्षेपार्ह भाषेत वर्तन करण्यात आले. या घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे संघटनेने म्हटले आहे.
प्रशासकीय अपयशाचे खापर डॉक्टरांवर फोडणे, त्यांच्यावर गुंडांकडून हल्ले घडवून आणणे आणि त्यांचा अपमान करणे ही गंभीर बाब असल्याचे आयएमएने नमूद केले आहे. अशा घटनांमुळे वैद्यकीय व्यवसायाकडे तरुणांचा ओढा कमी होत असून, वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशावरही त्याचा परिणाम होत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.









