रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे येथे खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप प्रभाकर गुरव (रा. मावळंगे, तळी गुरववाडी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गुरव हे १४ जुलै रोजी आपली पत्नी संचिता हिला मावळंगे येथील खाडीत खेकडे पकडण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, ते बराच वेळ घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि पूर्णगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, १५ जुलै रोजी सकाळी त्यांचा भाऊ स्वप्निल गुरव आणि गावातील काही लोक खाडी परिसरात त्यांचा शोध घेत असताना, संदीप गुरव हे मावळंगे गावडे आंबेरे नदीच्या खाजणात पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









