Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या दहा तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

टँकरमधील गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हातखंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
सध्या अपघातस्थळी गॅस टँकरमधील गॅस रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर दाखल झाला आहे. गॅस रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात येईल.

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून, हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.