लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील शांतीनगर परिसरातील रेस्ट हाऊसजवळ आज बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या क्रेटा कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कार (क्रमांक MH 01 CP 8021) गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लांजा येथील शांतीनगर परिसरात पोहोचली असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर (क्रमांक MH 05 EL 3877) पाठीमागून धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला असून, अपघाताचे नेमके कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.









