Tuesday, July 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील शिस्तभंगाच्या कारवाईचा धसका

जिल्हा प्रशासनातील शिस्तभंगाच्या कारवाईचा धसका

शासकीय कार्यालयांमध्ये वेळेचे भान;
नागरिकांच्या तक्रारींना मिळणार लगाम

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईचा थेट परिणाम आता जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचे वारे वाहू लागले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी वेळेवर उपस्थित नसणे, जेवणानंतर उशिरा परतणे किंवा ‘साहेबांची बैठक आहे’ अशी कारणे देऊन नागरिकांना ताटकळत ठेवणे, या तक्रारी सर्वसामान्यांकडून वारंवार केल्या जात होत्या. मात्र, वरिष्ठ स्तरावरील कारवाईमुळे आता चित्र पालटताना दिसत आहे. कार्यालयांमध्ये सकाळी वेळेवर उपस्थिती लावण्याकडे आणि दुपारच्या जेवणानंतर तत्काळ कामावर परतण्याकडे आता अधिकारी विशेष लक्ष देत आहेत.

प्रशासकीय वर्तुळात सध्या “आता घड्याळाकडे पाहूनच कार्यालयात ये-जा सुरू झाली आहे!” अशी चर्चा मिश्किलपणे सुरू आहे. शुक्रवारीच सुट्टीचा विचार करून कार्यालयातून गायब होणाऱ्या किंवा रजा, दौरा अशा कारणांचा आधार घेणाऱ्या प्रवृत्तीला या कारवाईमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. ही शिस्त केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी कार्यसंस्कृतीचा भाग बनावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

शिस्तभंगाच्या कारवायांचा मुख्य उद्देश प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक आणि नागरिककेंद्री बनवणे हा आहे. या कारवाईनंतर अधिकारी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून सामान्य नागरिकांना तत्पर सेवा देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रत्नागिरीच्या शासकीय यंत्रणेत झालेला हा बदल नागरिकांच्या सोयीचा ठरेल का आणि ही शिस्त किती काळ टिकून राहील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.