नगरसेवक वर्षा ढेकणे यांची मागणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शासनाकडून विशेष अनुदान
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. १५, आरक्षण क्र. ५८ येथे भव्य शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत हा निधी प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची मागणी नगरसेवक वर्षा ढेकणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. याबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर यासाठी सात कोटींचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा १०० टक्के खर्च राज्य शासन उचलणार आहे.रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. १५, आरक्षण क्र. ५८ मध्ये हे शॉपिंग सेंटर विकसित करण्यात येणार आहे.
या कामाची जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषदेकडे असणार आहे. शॉपिंग सेंटर विकसित करताना कामाच्या पारदर्शकतेबाबत शासनाचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने मंजूर केलेल्या या निधीच्या वापराबाबत काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. जर एखाद्या कामाची तांत्रिक मान्यता १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशा कामांचे गट करून ई-निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासकीय मान्यतेच्या रकमेचे विलगीकरण करून कार्यादेश देणे ही गंभीर अनियमितता मानली जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहील, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे.









