१३ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल
गुहागर:- तालुक्यातील पडवे येथील रहिमत मोहल्ला परिसरात मोहरमच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी शाकिरा मुस्तफा सारंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २६ जून रोजी मोहरम सणानिमित्त मोहल्ल्यातील एका व्यक्तीच्या निधनामुळे मिरवणूक रद्द करण्यात आली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी आणि साक्षीदारांची लहान मुले मोहरमची छोटी मिरवणूक घेऊन जात असताना आरोपी क्र. ८ च्या घरासमोर आरोपी वाद्ये वाजवत होते. मुलांना पुढे जाण्यासाठी साईड मागितल्याचा राग येऊन १३ आरोपींनी मुलांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी आणि साक्षीदार मुलांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून गेले असता, आरोपींनी त्यांनाही लक्ष केले. आरोपी क्र. २ ने साक्षीदार दिलबर टेमकर यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली आणि जमिनीवर पाडले, या झटापटीत त्यांची सोन्याची चैन गहाळ झाली. साक्षीदार शाहिदा सारंग यांचा हात पिरगळून त्यांना मारहाण केली. साक्षीदार कौसर तवसाळकर यांना वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांच्या डोक्यात मटका मारण्यात आला.
आरोपी क्र. २ ने नाझिया जांभारकर यांचा बुरखा ओढून त्यांना जमिनीवर ढकलून दिले.
जिवे मारण्याची धमकी आणि दागिने लुटले
रात्री पावणेनऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. ‘मुस्तफा आणि मुनाफ कुठे आहेत, बाहेर या’ असे म्हणत त्यांनी फिर्यादीच्या पतीला व मुलांना जिवे मारण्याची आणि घर जाळून टाकण्याची धमकी दिली. यादरम्यान आरोपी क्र. ६ याने फिर्यादीच्या कानाखाली मारून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून टाकले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२, १३१ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस उपनिरीक्षक आणि गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.









