रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत झळकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे रथातून भव्य मिरवणूक काढत ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
या परीक्षेत दामले विद्यालयाची इयत्ता ५वी मधील विद्यार्थिनी स्पृहा चंद्रशेखर जोशी हिने २७२ गुण मिळवून शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात १५वा येण्याचा दैदिप्यमान बहुमान मिळवला. तिच्यासोबतच इयत्ता ५वीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत हर्षवर्धन सचिन पाटील (जिल्ह्यात १२वा), आयुष अनिरुद्ध जोशी (२१वा), उमेर वसीम सय्यद (३५वा), दाक्षी उमेश शिंदे (३६वी), ईश्वरी रमाकांत डिंगणे (६१वी), साधना संजय लिंगायत (६२वी), स्वाती गंभिरानंद मदने (६५वी), आराध्या दिपक रानडे (९८वी), स्मित संदीप मांडवकर (११४वा) आणि प्रिती राजेश जाधव (११७वी) यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. मुकेश पाटील आणि श्री. इरफान शेख या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
तर इयत्ता ८ वीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. यामध्ये ओम हरिश्चंद्र वरेकर याने जिल्ह्यात ९वा क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ श्रेया सचिन खंदारे (जिल्ह्यात २९वी), सई मनोज जोशी (३५वी), सावनी आल्हाद आठलेकर (४२वी), आराध्य देवेंद्र डेंगळे (४३वा), ईशा विशाल चव्हाण (७५वी), राज रमेश कोकरे (८४वा), सिद्धी संदीप स्वामी (९२वी), आसावरी सौरभ अवताडे (९३वी) आणि स्वराज संजय लिंगायत (९४वा) यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना सौ. मंजिरी लिमये, सौ. सिद्धी विचारे, श्री. रवींद्र शिंदे, श्री. अक्षय जोगळेकर आणि श्रीम. ज्योती डंबाळे या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
दामले विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, प्रशासन अधिकारी प्रा. श्री. सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद संसारे आणि मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. सर्व स्तरातून या गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









