Tuesday, June 23, 2026
spot_img
Home शैक्षणिक रत्नागिरीत नीट पुनर्परीक्षा शांततेत; ८८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरीत नीट पुनर्परीक्षा शांततेत; ८८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरी:- वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘नीट’ पुनर्परीक्षा रविवारी रत्नागिरी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. पेपरफुटीच्या घटनांमुळे ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर, ही पुनर्परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली होती.

रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि फाटक हायस्कूल या दोन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १ हजार ३९ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ८८८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर १५१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

दुपारी २ ते ५.१५ या वेळेत ही परीक्षा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. परीक्षेच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षेसाठी दोन्ही केंद्रांवर स्थानिक पोलिसांसह सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

परीक्षेची ही दुसरी वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे तणावाचे वातावरण होते. सकाळपासूनच परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे अखेर ही परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली.