Thursday, June 25, 2026
spot_img
Home शैक्षणिक जि. प. शाळा पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात सुरु

जि. प. शाळा पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात सुरु

रत्नागिरी:- जिल्‍ह्यात पावसाने दडी दिल्‍यामुळे प्रचंड उष्‍म्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी ७ ते ११ या सत्रात सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून, गारवा पसरला आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील जि. प.च्‍या सर्व शाळा २४ जूनपासून पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात नियमित वेळेत सुरू ठेवण्‍याचे आदेश शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्‍यामुळे आजपासून जि. प.च्‍या शाळा दुपारच्‍या सत्रात सुरू झाल्या आहेत.

जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात पाऊस आल्‍यानंतर पावसाने उसंत घेतली. जिल्‍ह्यात उष्मा, वाढत्‍या उकाड्याने नागरिकांसह विद्यार्थी त्रस्‍त झाले होते. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वाढत्‍या तापमानाचा सामना करावा लागत होता. त्‍यामुळे शाळा दुपारऐवजी सकाळी करा अशी मागणी जोर धरू लागली होती. स्‍थायी समितीच्‍या बैठकीत चर्चा करून शाळा सकाळी भरवण्याचा निर्णय झाला. पाऊस सुरू झाल्‍यानंतर नियमित दुपारच्‍या सत्रात शाळा सुरू होतील, असे आदेश सीईओ वैदेही रानडे यांनी दिले होते.

विद्यार्थ्यांना दिलासा

सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस शाळा सकाळच्‍या सत्रात भरल्‍या. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला. दोन्‍ही दिवशी जिल्‍ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे उष्म्यापासून हैराण झालेल्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्‍यामुळे आता शाळा बुधवारपासून पूर्वीच्‍या वेळेत दुपारच्‍या सत्रात सुरू करा, असे आदेश शिक्षण विभागाच्‍या वतीने जिल्‍ह्यातील सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले त्याप्रमाणे आजपासून शाळा दुपारी सुरु करण्यात आल्या आहेत.