Tuesday, August 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी १२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप

१२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप

गुहागर:- गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून आणि दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत, दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२०१४ मध्ये गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (गुन्हा रजि. क्र. ६७/२०१४, भादंवि कलम ३०२, ३९४, ३४). विश्वास खरे यांची हत्या करून दरोडा टाकल्याप्रकरणी हा खटला सुरू होता. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने अमोल चंद्रकांत गाडवे (रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांना दोषी ठरवले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागेल. या प्रकरणात विष्णू किसन कनपुरे (रा. पुणे) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्याच्या यशामागे गुहागर पोलिसांनी केलेला सखोल आणि शास्त्रीय तपास महत्त्वपूर्ण ठरला. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने न्यायालयात अत्यंत भक्कम बाजू मांडली.

या तपासात तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत, आशिष बल्लाळ, प्रकाश मोरे आणि एस. एल. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सद्यस्थितीत गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. सरकारी वकील ॲड. पी. आर. साळवी यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि हेड कॉन्स्टेबल ए. एस. शिंदे यांनी खटल्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यात विशेष मेहनत घेतली.

१२ वर्षांच्या या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर लागलेल्या या निकालामुळे “गुन्हा कितीही जुना असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही,” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. गुहागर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.