Thursday, July 2, 2026
spot_img
Home खेड शेतातील गवत जाळताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

शेतातील गवत जाळताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

खेड:- शेतात गवत जाळताना आगीच्या विळख्यात सापडून गंभीर जखमी झालेल्या एका ७९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील दाभिळ-माळवाडी येथे घडली आहे. लक्ष्मण भागोजी पाडावे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पाडावे हे आपल्या शेतात गवत जाळण्याचे काम करत होते. दरम्यान, दृष्टी कमी असल्याने आगीचा अंदाज न आल्याने अचानक आगीच्या ज्वाळा त्यांच्या अंगावर आल्या. या दुर्घटनेत त्यांची छाती, पाठ, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि कंबरेपासून खालचा भाग गंभीरपणे भाजला होता.

अपघातानंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील ‘लाईफ केअर’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील परेल येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेबाबतची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वृद्ध शेतकऱ्याचा अशा प्रकारे झालेला अंत पाहून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.