Tuesday, September 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण कन्या तब्बल ८ तास उशिरा

कोकण कन्या तब्बल ८ तास उशिरा

मांडवी एक्सप्रेसमधील बिघाडाचा फटका

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका शनिवारी प्रवाशांना बसला. या बिघाडामुळे संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावल्या. त्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मडगावकडे जाणारी गाडी क्रमांक १०१११ कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल आठ तास उशिराने खेड स्थानकात दाखल झाली.

खेड रेल्वे स्थानकावर पहाटे ३.०४ वाजता पोहोचून ३.०६ वाजता पुढे रवाना होणारी कोकण कन्या एक्सप्रेस सकाळी ११.१० वाजता स्थानकात पोहोचल्याने प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. रेल्वेच्या या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

या गोंधळाचे मूळ कारण शुक्रवारी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले आहे. खेड स्थानकापासूनच मांडवी एक्सप्रेसच्या ३ई एसी डब्यांतील वातानुकूलन यंत्रणा अचानक बंद पडली. त्यामुळे उकाड्यात प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

यानंतर रत्नागिरी स्थानकावर मांडवी एक्सप्रेस थांबवून इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या दुरुस्तीनंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू झाली. मात्र या तांत्रिक अडचणीमुळे मांडवी एक्सप्रेसचा विलंब वाढला आणि त्याचे पडसाद कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही उमटले.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवर तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.