१० लाखांच्या खैर लाकडासह पिकअप वाहन जप्त
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागाने भरदुपारी पाठलाग करून पकडले. या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीची खैराची लाकडे आणि ९ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (एमएच-०८ एपी ६७९४) तपासणीसाठी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला. यानंतर वन विभागाच्या पथकाने तत्काळ पाठलाग सुरू करून संबंधित वाहन ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैराची लाकडे आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, जि. पुणे) यांच्याविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील तसेच वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांनी ही धडक कारवाई केली.
जप्त करण्यात आलेले वाहन आणि खैर लाकडे वन विभागाच्या ताब्यात घेऊन माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आले आहेत. यापूर्वी उघड झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खैर व कातनिर्मिती उद्योगांच्या राज्यस्तरीय साखळीशी या प्रकरणाचे धागेदोरे जोडले जात असल्याची माहिती समोर आली असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









