रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर परिसरात गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत एका शिक्षकाची तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान सिद्धीविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली. याबाबत रमेश विश्राम खापरे (वय ५४, व्यवसाय शिक्षक, रा. सिद्धीविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा गॅस पुरवठा बंद होणार असून आम्ही त्यासाठी मदत करतो, असे सांगून संबंधित व्यक्तीने खापरे यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपद्वारे ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची अॅप्लिकेशन फाईल पाठवून ती उघडण्यास सांगितले. या अॅपमध्ये डेबिट कार्डची माहिती भरण्यास सांगून अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या खात्यातून एकूण ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क) व ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.









