Tuesday, June 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दारूच्या नशेत मुलाकडून वृद्ध पित्याला बेदम मारहाण

दारूच्या नशेत मुलाकडून वृद्ध पित्याला बेदम मारहाण

डोक्यात खुर्ची मारून जखमी केल्याने गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील करंजाणी कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध पित्याला आणि मातेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० च्या सुमारास करंजाणी कातळवाडी येथे घडली. फिर्यादी सुरेश श्रीपद आग्रे (वय ६७) हे आपल्या पत्नी सुरेखा यांच्यासोबत घरी असताना, त्यांचा मुलगा सुरेंद्र सुरेश आग्रे (वय ३७) हा दारूच्या नशेत घरी आला.

सुरेंद्र याने आपले वडील सुरेश यांनी दुसरा विवाह केला असल्याच्या रागातून घरात वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सुरेंद्रने आधी आपल्या आईला शिवीगाळ करत धक्काबुकी केली. ही भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सुरेश आग्रे यांनाही आरोपी मुलाने धक्काबुकी करत हाताच्या थापटांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, संतप्त सुरेंद्रने घरातील फायबरची खुर्ची उचलून आपल्या वृद्ध पित्याच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत.

या मारहाणीनंतर १४ जून रोजी पहाटे २.२९ वाजता सुरेश आग्रे यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरेंद्र सुरेश आग्रे याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ११५(२) आणि भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. दारूच्या नशेत मुलाने केलेल्या या कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.