न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई
रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील करोडो रुपयांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट फेरफार आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी उमा उदय गुजर यांच्यासह इतर संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना कडक अटी शर्तीवर आणि दोन्ही संशयितांसाठी मिळून ५० हजार रुपयांचा जामीन न्यायालयात देण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. राजेंद्र घोरपडे यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला अत्यंत प्रखर विरोध दर्शवला. आरोपींनी न्यायालयाचे आधीचे आदेश जाणीवपूर्वक लपवून ठेवून, महामार्ग १६६ च्या भूसंपादनातून सहदायिकांचे तब्बल ७.५ कोटी रुपयांचे अनुदान बेकायदेशीररीत्या लाटले आहे, असा गंभीर आरोप अॅड. घोरपडे यांनी न्यायालयात केला. फसवणूक करून मिळवलेल्या या मोठ्या रकमेसह आरोपी परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये
आणि त्यांचे पारपत्र जप्त करण्यात यावे, अशी मागणी फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपींवर अत्यंत कठोर अटी लादल्या आहेत. या अटींनुसार, आरोपींना पुराव्यांशी कोणतीही छेडछाड न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना देश सोडून जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
फिर्यादी सुनीता शिवराम देसाई (रत्नागिरी) यांच्या आई वत्सलाबाई यांचे ३० एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. त्यानंतर २४ मे २०२१ रोजी फिर्यादीची बहीण उमा गुजर (आरोपी क्र. १) हिने आरोपी क्र. २ याने साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र आणि आईचे २५ मार्च २०१० रोजीचे तथाकथित मृत्यूपत्र नाचणेतील तलाठी यांच्याकडे सादर करून मिळकतींना स्वतःचे नाव लावण्यासाठी खोटा अर्ज सादर केला.
फिर्यादी सुनीता देसाई आणि साक्षीदार संदीप कदम यांनी ॲड. राजेंद्र घोरपडे यांच्या मार्फत न्यायालयात दिलेल्या कथनानुसार, आरोपींनी आईच्या बनावट सह्या करून हे खोटे मृत्यूपत्र व हस्तांतरणाचे कागदपत्रे तयार केली होती. मूळ मृत्यूपत्रात केवळ तीन खाते क्रमांकांचा उल्लेख असताना, प्रतिज्ञापत्रात इतर अनेक भूमापन त क्रमांकांचा उल्लेख करून बेकायदेशीर फेरफार मंजूर करून घेण्यात आले. या प्रकरणात फिर्यादीने महसूल अधिकाऱ्यांवरही संगनमताचा आरोप केला होता.









