ठोस धागेदोरे नाहीत; नागरिकांत भीती
रत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे घडलेल्या गावठी बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेला आठ दिवस उलटून गेले, तरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे लागले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत गावठी बॉम्ब सापडूनही पोलिस अद्याप संशयितापर्यंत पोचलेले नाहीत. आरोपीं अद्याप मोकाट आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाटद पोलिसचौकी हद्दीतील जांभारीफाटा येथे १९ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५) या जंगलात लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या असताना त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून, त्या गंभीर जखमी झाल्या. जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, श्वानपथक तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली.
या तपासादरम्यान तब्बल २९ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडूनही तपासात अद्याप कोणतीहीं प्रगती झालेली नाही. हे बॉम्ब नेमके कोणी तयार केले, कोणत्या उद्देशाने जंगल परिसरात लपवून ठेवले आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. या संपूर्ण प्रकरणामागे एखादे मोठे रॅकेट किंवा गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, अशीही चर्चा आता स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे.









