Friday, May 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू, पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू, पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

राजापूर:- आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी बांबू आणि पाईपने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नालासोपारा येथील महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघा नातेवाईकांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी पम्मी फलचंद जयस्वार (वय ४३) यांच्या आई पार्वती मासये यांच्या मालकीच्या जागेच्या वारस तपासावरून त्यांच्या नातेवाईकांसोबत वाद सुरू आहेत. फिर्यादी पम्मी या त्यांची आई पार्वती, मुलगा मेघनाथ आणि बहीण पुष्पा यांच्यासोबत राजापूर येथे जात असताना, २५ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिवंडमाळ येथे आरोपी वैभव मासये याने त्यांना पाहून अश्लील शिवीगाळ केली. ‘तुम्ही परत मुंबईला जिवंत जाणार नाही’ अशी धमकी देत त्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले.
यानंतर २६ मे रोजी सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पम्मी या आपल्या आई, मुलगा आणि बहिणीसह आरोपी मंगल बाबुलाल हडाळे यांच्याकडे आधारकार्ड आणण्यासाठी मांडरुळ गणेशवाडी येथे गेल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या आरोपी मानसी वैभव मासये हिने फिर्यादी पम्मी, त्यांचा मुलगा मेघराज, बहीण पुष्पा गणेश पुजारी आणि आई पार्वती सीताराम मासये यांना लाकडी बांबू आणि पाईपने बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात पुष्पा पुजारी, पार्वती मासये, पम्मी जयस्वार आणि मेघराज जयस्वार हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणी २७ मे रोजी सकाळी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मंगल बाबुलाल हडाळे (वय ५०), मानसी वैभव मासये (वय २३) आणि वैभव मासये (सर्व रा. मंदरुळ गणेशवाडी, राजापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ७९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.