Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी धान्य वितरणाचे कमिशन न मिळाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत

धान्य वितरणाचे कमिशन न मिळाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत

केरोसीन आणि धान्य वितरणात अडचणींमुळे रेशनिंग संघटना आक्रमक,

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनिंग धान्य आणि केरोसीन दुकानदारांना त्यांनी केलेल्या धान्य वितरणाचे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. यासोबतच केरोसीन आणि धान्य वितरणात अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या असून, या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी ‘रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटने’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसीन वितरण करण्यास तयार नाहीत, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

शासकीय नियमांनुसार केरोसीन वितरण यंत्रणा राबवण्याची कार्यवाही पुरवठा कार्यालयाकडून सुरू असली, तरी त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत.शासनाच्या आदेशानुसार केरोसीन थेट धान्य दुकानांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.मात्र, केरोसीन डीलरना त्याचे बिल तात्काळ अदा करणे दुकानदारांना शक्य होत नाही, त्यामुळे केरोसीनचे बिल हे प्रत्यक्ष वितरण पूर्ण झाल्यानंतरच स्वीकारण्यात यावे, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.सर्व रेशनकार्ड धारकांना केरोसीन मिळाले पाहिजे, पण या तांत्रिक अडचणी सुटल्याशिवाय वितरण करणे अशक्य असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, प्रशासनाच्या आदेशानुसार माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वाटप पॉज मशीनद्वारे करण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, शासकीय गोदामांमधून धान्य वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अद्याप अनेक कार्डधारक धान्य नेण्यापासून वंचित राहिले आहेत.त्यातच पॉज मशीनवरून एप्रिल महिन्याचा धान्याचा कोटा अचानक हटवण्यात आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा कोटा तात्काळ कॅरीफॉरवर्ड करून मशीनवर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शिल्लक राहिलेल्या कार्डधारकांना वेळेत धान्य वाटप करणे शक्य होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

धान्य वितरण सुरळीत ठेवणाऱ्या या दुकानदारांना गेल्या काही महिन्यांचे कमिशन न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्व गंभीर मुद्द्यांचा तात्काळ विचार करावा, वितरणातील तांत्रिक दोष दूर करावेत आणि केरोसीन तसेच धान्य वितरण व्यवस्था पूर्ववत सुरळीत करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.