Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी कर्ला- आंबेशेत येथे आगीत घर जळून खाक

कर्ला- आंबेशेत येथे आगीत घर जळून खाक

दागिने, दोन लाखांच्या रोख रकमेसह लाखोंचे नुकसान

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील आंबेशेत कर्ला परिसरात मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण दुर्घटना घडली. एका बंद घराला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या भीषण आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, दागिने आणि दोन लाखांची रोकड जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

​​मिळालेल्या माहितीनुसार, आंबेशेत येथील संबंधित कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे मंगळवार सकाळी आपल्या कामासाठी घराबाहेर पडले होते. घर बंद असताना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. क्षणाक्षणाला आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीने वेढले.

​परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घर बाहेरून कुलूपबंद असल्याने सुरुवातीला आग विझवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिकांनी वेळ न घालवता घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.

आग भडकत असतानाच नागरिकांनी जीवाची परवा न करता घरातील गॅस सिलेंडर तातडीने सुरक्षितरित्या बाहेर काढले. नागरिकांच्या या समयसूचकतेमुळे गॅसचा स्फोट टळला आणि एक मोठी जीवितहानी व अनर्थ टळला. यानंतर नागरिकांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

​​ही आग एवढी भीषण होती की, काही वेळातच घरातील सर्व सामान सुमान जळून खाक झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे, घरातील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने आणि घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यासाठी आणून ठेवलेली सुमारे दोन लाख रुपयांची रोकड (कॅश) या आगीत पूर्णपणे जळून कोळसा झाली. या आगीत कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे.

सकाळी अचानक घराला आग लागल्याचे आमच्या लक्षात आले. घर बंद असल्याने सुरुवातीला काय करावे सुचत नव्हते. आम्ही तातडीने दरवाजाचे कुलूप तोडून आत गेलो आणि सर्वात आधी गॅस सिलेंडर बाहेर काढले, ज्यामुळे मोठा स्फोट टळला. पण आग एवढी मोठी होती की घरातील सामान आणि दोन लाखांची रोकड वाचवता आली नाही.

​या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून, आगीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शॉर्टसर्किटमुळे घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.