रत्नागिरी:- मैत्रिणीला फितवण्याच्या संशयातून मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याने पूर्वनियोजित कट रचून सुरज झोरे या तरुणाचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र, या घटनेनंतर म्हात्रे याची ती मैत्रिण अचानक गायब झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती मुंबईत गेल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी तिला चौकशीसाठी रत्नागिरीत बोलावले आहे.
ही घटना गुरुवार (२१ मे) रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव साईनगर येथे घडली होती. या खूनप्रकरणी नंदा फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८), अभिषेक देवानंद राठोड (वय २२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (वय २१) या तिघांना अटक केली आहे.
खुनाच्या घटनेच्या दिवशी संशयित सोहम म्हात्रे याची मैत्रिणही रत्नागिरीत आली होती आणि ती या सर्वांसोबत होती. पोलिसांनी केलेल्या कसून
चौकशीत सुरज झोरे याने त्या मुलीला ‘म्हात्रेवर भरवसा ठेवू नकोस,’ असे सांगून तिचे मन वळवण्याचा म्हणजेच फितवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब म्हात्रेच्या कानावर जाताच, रागातून त्याने सुरजचा काटा काढला.
या घटनेनंतर संशयित आरोपी सोहम म्हात्रेची मैत्रिण अचानक गायब झाली होती. तिचा शोध घेतला असता ती मुंबईत असल्याचे कळले. तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतर अधिक तपशील कळणार आहे. दरम्यान, या खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे.
म्हात्रे याची मैत्रिण सोबत असतानाच तिच्यासमोर सुरजवर हा खुनीहल्ला करण्यात आला. तिन्ही आरोपींनी सुरजवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर, हातावर वार झेलत सुरज जिवाच्या आकांताने तिथून पळत सुटला. लगतच्या एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग करून तिथेच त्याला मारले.









