प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; अग्निरोधक सिलिंडरच्या मदतीने आग आटोक्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रविवारी एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील वरची आळी परिसरातील ओंकार ॲग्रोटेक या शेतीविषयक यंत्रसामुग्रीच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुले आग लागली. मात्र स्थानिक नागरिक आणि तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
वरची आळी येथील ओंकार ॲग्रोटेक हे शेतीची अवजारे आणि यंत्रसामुग्री विक्री करणारे शहरातील नामांकित दुकान आहे. आज सकाळी दुकानात अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री, ऑईल आणि अन्य साहित्य असल्याने आग वेगाने पसरण्याची भीती निर्माण झाली होती. दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर येताना पाहताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. सुरुवातीला पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, जवळच राहणारे नीलेश मलुष्टे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निरोधक सिलिंडर आणला. मलुष्टे यांनी अग्निरोधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग काही मिनिटांत आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.









