रत्नागिरीत गुन्हेगारीचा आलेख घसरला; मात्र ‘घरफोडी’च्या गुन्ह्यांची पोलिसांना ताप

रत्नागिरी:- कोकणची राजधानी असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारीच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत शहराचा एकूण गुन्हेगारीचा आलेख १६२६ वरून १४१० पर्यंत खाली घसरला असला, तरी घरफोडीच्या घटनांनी पोलिसांची चिंता वाढवली आहे. गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले असले, तरी मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांनी पोलिसांपुढील आव्हान कायम ठेवले आहे.

शहरात खुनासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. २०२३ मध्ये खुनाचे १८ गुन्हे नोंदवले गेले होते, जे २०२५ मध्ये १३ वर आले आहेत. विशेष म्हणजे, या तीन वर्षांतील खुनाचे सर्वच्या सर्व गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्येही लक्षणीय घट झाली असून, ठकबाजांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

एका बाजूला गंभीर गुन्हे कमी होत असताना, दुसरीकडे चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी रत्नागिरीकरांची झोप उडवली आहे. २०२५ मध्ये चोरीच्या २२८ घटनांची नोंद झाली, परंतु त्यातील निम्म्याहून अधिक गुन्हे अद्याप उघड होऊ शकलेले नाहीत. विशेषतः दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांचे प्रमाण १५ वरून २३ वर पोहोचले आहे. रात्रीच्या ७९ घरफोड्यांपैकी केवळ ३३ प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला हुलकावणी देण्याचे नवे तंत्र अवलंबल्याचे चित्र आहे.

महिलांवरील विनयभंगाच्या घटना आणि रस्ते अपघातातील मृत्यूंचे सत्र अद्यापही चिंतेचा विषय आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अवलंबून न राहता तांत्रिक तपासाची व्याप्ती वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. तपासाचे एकूण यश समाधानकारक असले, तरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे हेच आता रत्नागिरी पोलिसांपुढील मुख्य लक्ष्य असणार आहे.