चिपळूण:- शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून वृध्दाला जबर मारहाण करण्यात आली होती. चौघांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारानंतर घरी असताना त्यांचे निधन झाले असून यशवंत कृष्णा फके (वय ७३) असे त्यांचे नाव आहे. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी २९ एप्रिलला दुपारी ओझरवाडी शंकर मंदिरसमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवाद झाला होता. येथे फके यांना चौघांकडून मारहाण झाली होती. ज्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार झाले होते. तर उपचारानंतर ते घरी विश्रांती घेत होते.
मात्र, शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
फके यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांचे नातेवाईक व ओझरवाडीतील नागरिक कामथे रुग्णालय येथे जमले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









