खेड:- तालुक्यातील बोरज-आग्रेवाडी येथील एका ४५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुध आणण्यासाठी घराबाहेर पडलेला हा तरुण आपल्याच कारमध्ये डॅशबोर्डवर डोके ठेवलेल्या मृतावस्थेत मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद रामचंद्र चिनकटे (वय ४५, रा. बोरज-आग्रेवाडी, सध्या रा. शनिनगर-पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार, ११ मे रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास अरविंद हे आपली चारचाकी गाडी (क्र. MH-12-VT-0286) घेऊन ‘दूध आणायला जातो’ असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांच्या आई आशा रामचंद्र चिनकटे यांनी नातेवाईकांसह त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना बोरज येथील देऊळमाळ भागात त्यांची कार उभी असल्याचे ग्रामस्थांकडून समजले.
कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, अरविंद हे कारच्या चालक सीटवर डॅशबोर्डवर डोके ठेवून झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने गाडीबाहेर काढून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. या घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटलांमार्फत खेड पोलीस ठाण्याला देण्यात आली.
अरविंद यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे हलवण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती रात्री ७:२० वाजण्याच्या सुमारास त्यांना ‘मृत’ घोषित केले.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









