Sunday, May 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; तापमानात मोठी घट

रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; तापमानात मोठी घट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः धडकी भरवली. शनिवारी दुपारी सुमारे चार वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसामुळे रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाचा जोर इतका होता की अनेक भागांत रस्त्यांवर चिखल व माती आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. विशेषतः मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पावसासह वादळी वाऱ्यांनीही जोर धरला. त्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या, तर अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने, सध्यातरी कोणतीही जिवीतहानी झाल्याची नोंद प्रशासनाकडे नाही.

दरम्यान, गतवर्षीही याच कालावधीत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यंदाच्या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक चिंतेत सापडले आहेत. आधीच बाजारात आंब्याचे दर दबावात असताना या पावसामुळे फळांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून दर आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ऐन लग्नसराईच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने विवाह समारंभांच्या आयोजनातही मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा असा जोर पाहायला मिळत असल्याने “यंदा पावसाळा लवकर सुरू होणार का?” अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.