Saturday, May 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापुरात जमीन, विहिरीच्या वादातून हाणामारी

राजापुरात जमीन, विहिरीच्या वादातून हाणामारी

दोघांवर गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील तेरवण, थोरलीवाडी येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून एका महिलेवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रूपाली रवींद्र खानविलकर (वय २७) आणि आरोपी यांच्यात सामायिक जमीन आणि विहिरीवरून जुना वाद आहे. ६ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी सुवर्णा मोहन खानविलकर ही फिर्यादीच्या घराजवळ आली. “विहिरीची कप्पी कोणी काढली?” असा जाब विचारत तिने रूपालीचे वडील आणि चुलत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात सुवर्णा खानविलकर हिने हातातील कोयत्याने विहिरीची दोरी आणि पाईप कापून नुकसान केले. जेव्हा फिर्यादी रूपाली यांनी आपल्या वडिलांना शिवीगाळ न करण्याबाबत सांगितले, तेव्हा आरोपी सुवर्णाने हातातील कोयता रूपाली यांच्यावर उगारला. या हल्ल्यात रूपाली यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. यावेळी दुसरा आरोपी रुपेश मोहन खानविलकर यानेही घटनास्थळी येऊन फिर्यादीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व दमदाटी केली.

याप्रकरणी रूपाली खानविलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी आरोपी सुवर्णा मोहन खानविलकर आणि रुपेश मोहन खानविलकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३२४(१)(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.