Saturday, May 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहराला खोदकामाचा विळखा;पालिकेच्या सभेत ‘महानगर गॅस’ला धारेवर धरले!

रत्नागिरी शहराला खोदकामाचा विळखा;पालिकेच्या सभेत ‘महानगर गॅस’ला धारेवर धरले!

जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दिरंगाईवरूनही नगरसेवक आक्रमक; ४ मे रोजी होणार निर्णायक बैठक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात महानगर गॅस कंपनीने शंभरहून अधिक ठिकाणी खोदकाम करून शहर अक्षरशः पोखरून काढले आहे, मात्र एकही काम पूर्णत्वास नेले नसल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद रत्नागिरी नगरपरिषदेच्या वादळी ठरलेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. “जर तुमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नाही, तर मग संपूर्ण शहर का खोदून ठेवले आहे?” असा संतप्त सवाल करत नगरसेवक बंड्या साळवी, सौरभ मलुष्ठे, राजन शेट्ये, निमेश नायर आणि स्मितल पावसकर यांनी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला.

शहरातील विविध प्रभागांत सुरू असलेल्या गॅस वाहिनीच्या खोदकामामुळे मुख्य जलवाहिन्या फुटून पाणीपुरवठा खंडित होत असल्याकडे पाणी सभापती निमेश नायर यांनी लक्ष वेधले. जुनी कनेक्शन्स अद्याप प्रलंबित असताना नवीन खोदाई कशासाठी केली जात आहे, असा आक्रमक पवित्रा सौरभ मलुष्ठे यांनी घेतला. पावसाळा तोंडावर आला असताना या उघड्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल राजन शेट्ये यांनी उपस्थित केला. यावर नगराध्यक्षांनी गंभीर दखल घेत येत्या ४ मे रोजी महानगर गॅस कंपनी आणि सर्व ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावली असून, तोपर्यंत कामात सुधारणा करण्याची तंबी दिली आहे. तसेच मुख्याधिकारी वैभव गारवे यांना पॅचवर्कच्या कामासाठी तातडीने निविदा काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गॅसच्या प्रश्नासोबतच जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी सामान्य जनतेला ४ ते ५ महिने ताटकळत ठेवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरही नगरसेवकांनी हल्लाबोल केला. प्रणालीचे कारण सांगून पळवाट शोधू नका, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा यावेळी देण्यात आला. मुरुगवाडा येथील भागोजीशेठ स्मशानभूमीची संरक्षक भिंत आणि आठवडा बाजारातील शौचालयाच्या आउटलेट पाईपचा प्रश्नही सभेत गाजला. काही नागरिकांचा विरोध असला तरी महिलांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस संरक्षणात हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून अमित विलणकर, केतन शेट्ये आणि समीर तिवरेकर यांनीही प्रशासनाला धारेवर धरले, ज्यामुळे संपूर्ण सभा गाजली.