Saturday, May 2, 2026
spot_img
Home खेड भरणे येथे ट्रकला कारची धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

भरणे येथे ट्रकला कारची धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका उभ्या ट्रकला वॅगनार कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून, यात एका वर्षाच्या चिमुरडीसह ८० वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी पहाटे ३:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील भांडुप येथून ही वॅगनार कार (क्रमांक MH 03 FC 1145) मालवणच्या दिशेने जात होती. खेड तालुक्यातील भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलसमोर ही कार आली असता, तेथे उभ्या असलेल्या ट्रकवर (क्रमांक KA 02 AG 2025) कारची पाठीमागून धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील सहाही प्रवासी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ सुजित शिंदे आणि शुभम यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना कारबाहेर काढले.