रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली असून मच्छिमार्केट रोड परिसरात गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार ४०० रुपये किमतीचा १३६ ग्रॅम गांजा जप्त केला असून संबंधित आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहरात गस्तीवर असताना, मच्छिमार्केट रोडवरील केळीच्या वखारीजवळ एक संशयित तरुण अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस फौजदार बाळू धोंडीराम जाधवर आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात अदनान बशीर मस्तान (वय ३०, रा. मिरकरवाडा, सध्या रा. कीर्तीनगर, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १३६ ग्रॅम वजनाचा हिरवट काळपट रंगाचा आणि उग्र वासाचा गांजा मिळून आला.
हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अदनान मस्तान याला अटक केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता गु. र. नं. १२६/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(अ) आणि २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील अंमली पदार्थ विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शहर आणि परिसरात अशा प्रकारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









