Friday, July 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मजुराला लोखंडी पाईपने मारहाण; डोक्याला गंभीर दुखापत

मजुराला लोखंडी पाईपने मारहाण; डोक्याला गंभीर दुखापत

खेड:- खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोंडे येथील निकम चाळीत राहणाऱ्या एका ५५ वर्षीय मजुराला शेजाऱ्याने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कालीकुमार भक्त मेहता (वय ५५, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) हे सध्या खोंडे येथील निकम चाळीत वास्तव्यास आहेत. दि. १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी आपल्या घरी आले होते. खोलीच्या खिडकीत ठेवलेली चावी काढत असताना, त्यांचा शेजारी विश्वास विलास निकम (वय ४०) याने अचानक पाठीमागून येऊन त्यांना कशाचीही पूर्वकल्पना न देता लोखंडी पाईपने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी कालीकुमार मेहता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबतची तक्रार फिर्यादीने खेड पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी आरोपी विश्वास विलास निकम याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) आणि भा.द.वि.क. ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद रात्री ८ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.