Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पत्नीला सासरी नेऊन मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीला सासरी नेऊन मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला तिच्या माहेरून सासरी नेऊन, तिथे वाद घालून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमधील काविळतळी येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशात अजमल कडवईकर (वय ३३, रा. उक्ताड, चिपळूण) या सध्या आपल्या माहेरी राहत आहेत. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी पती अजमल अस्लम कडवईकर हा उक्ताड येथील त्यांच्या घरी गेला. “मला तुझ्याशी बोलायचे आहे,” असे गोड बोलून त्याने निशात यांना काविळतळी येथील ‘कोयना बिल्डिंग’मधील आपल्या घरी नेले.

काविळतळी येथे पोहोचल्यावर दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अजमलने पत्नीला हाताच्या थापटाने मारहाण केली आणि शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून निशात जेव्हा तिथून परत जाऊ लागल्या, तेव्हा आरोपीने त्यांना ओढले आणि त्यांचे डोके दोन्ही हातांनी धरून त्यांच्या दोन्ही गालांवर व उजव्या हातावर जोरात चावा घेतला. तसेच, झटापटीत आरोपीच्या हातातील घड्याळ लागून निशात यांच्या डाव्या डोळ्याखाली किरकोळ दुखापत झाली.

​या गंभीर प्रकारानंतर जखमी निशात कडवईकर यांनी पोलिसांत धाव घेतली. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती अजमल कडवईकर विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. २१ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.