बुधवारपासून महसूल संघटनाही संपात सामील; सातबारा, दाखल्यांसाठी नागरिकांचे हाल
रत्नागिरी:- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून येत आहे. बुधवारपासून या संपात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना देखील पूर्ण ताकदीनिशी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट पसरला असून, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
सर्व स्तरातील कर्मचारी संपात सहभागी रत्नागिरीतील पदोन्नत नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई आणि कोतवाल संवर्गातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे केवळ तहसील कार्यालयच नव्हे, तर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळपासूनच कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याने संपाची तीव्रता अधिक जाणवत होती.
मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष वेतनवाढ, पदोन्नती, रिक्त पदे तातडीने भरणे, वाढता कामाचा ताण कमी करणे आणि सेवा अटींमध्ये सुधारणा करणे या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. “वारंवार निवेदने देऊन आणि बैठका घेऊनही शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने अखेर आम्हाला बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले,” अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिक आणि विद्यार्थ्यांची कोंडी या संपामुळे सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न, जात व रहिवासी प्रमाणपत्रे मिळणे कठीण झाले आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशांचा काळ जवळ येत असल्याने दाखल्यांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. तसेच शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनाही या प्रशासकीय कोंडीचा फटका बसत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.









