रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारी दुपारी करण्यात आलेल्या धडक कारवाईत सुमारे ११ हजार ५१८ रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीम. तृप्ती व्यंकटेश घरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ एप्रिल रोजी दुपारी २:०० ते ४:३० च्या दरम्यान रत्नागिरी शहर परिसरात ही कारवाई करण्यात आली. शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ मानवी आरोग्यास घातक असूनही, त्यांची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे या कारवाईत निष्पन्न झाले.
या प्रकरणात पोलिसांनी स्वप्निल नरेंद्र गावखडकर (वय ४०, रा. तेली आळी, रत्नागिरी), संजय पांडुरंग तावडे (वय ४१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी), महेंद्र रघुनाथ सावंतदेसाई (वय ५९, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) या आरोपींवर गुन्हे नोंदवले आहेत:
प्रशासनाने केलेल्या या कारवाईत एकूण ११ हजार ५१८ रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








